लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या भारतात ११३ अब्जाधीश आहेत. सन २०२५ पर्यंत ही संख्या १६२ वर जाऊन पोहोचणार आहे. तसेच देशातल्या अतिश्रीमंतांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढणार आहे.
नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय मालमत्ता कन्सल्टन्सीच्या ‘वेल्थ रिपोर्ट २०२१’ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ज्यांची मालमत्ता ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा भारतीयांची संख्या येत्या पाच वर्षांत ६३ टक्क्यांनी वाढून ११ हजार १९८ पर्यंत पोहोचणार आहे. सध्या या अतिश्रीमंतांची संख्या देशात ६ हजार ८८४ आहे.
अतिश्रीमंत लोक काय खरेदी करतात, याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार दागिन्यांना सर्वाधिक प्राधान्य राहिले आहे. त्यापाठोपाठ पेंटिंग्ज, घड्याळे, वाइन आणि ‘क्लासिक कार्स’ची खरेदी अतिश्रीमंत वर्गाला महत्त्वाची वाटत असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर दुर्मिळ व्हिस्कीच्या ऐवजी वाइनला जास्त प्राधान्य असल्याचे स्पष्ट झाले. भारतातले ४६ टक्के अतिश्रीमंत पर्यावरणात्मक, सामाजिक आणि प्रशासनात्मक आधारित मालमत्ता गुंतवणुकीत स्वारस्य राखणारे आहेत.
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “महामारीनंतर आर्थिक कार्यसंचालन तिच्या कार्यक्षमतेच्या उच्च पातळ्यांपर्यंत पोहोचत असताना भारत पुढील पाच वर्षांत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स समूहामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. देशात नवश्रीमंतांची भर पडेल.”
चौकट
मालमत्ता निर्मिती
जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असतानाही सन २०२० मध्ये अतिश्रीमंत भारतीयांच्या मालमत्तेत ५९ टक्के वाढ झाली आढळले. तसेच ९१ टक्के अतिश्रीमंत भारतीयांना यंदाच्या म्हणजेच २०२१ मध्येही आपल्या मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता वाटत आहे. नाइट फ्रँकच्या अंदाजानुसार, येत्या चार वर्षांत आशियामधल्या अतिश्रीमंतांची संख्या सर्वाधिक वाढणार आहे. यात इंडोनेशिया (६७ टक्के) आणि भारत (६३ टक्के) यांचा प्रामुख्याने समावेश असेल.