प्रवाशांच्या सोयीसाठी थांबे वाढविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोची दुसरी लाट हळूहळू ओसरत असताना प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या वाढली आहे. मात्र, कोविड स्पेशल व फेस्टिव्हल स्पेशल दर्जाच्या गाड्यांची संख्या अधिक असल्याने छोट्या स्थानकावर त्यांना थांबा नाही. त्यामुळे गाड्यांच्या संख्या वाढूनही प्रवाशांची गैरसोय मात्र थांबली नाही.
पुणे रेल्वे स्थानकावरून पूर्वी रोज २२० रेल्वे धावत. आता ती संख्या १७० ते १८० इतकी झाली आहे. वास्तविक काही छोटे थांबे आहेत, तेथेही प्रवाशांची संख्या जास्त असते. असे असतानाही सुरू झालेल्या रेल्वे गाड्यांच्या थांब्यात कोणताही बदल केला गेला नाही. त्यामुळे या प्रवशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पुणे स्थानकावरून जाणाऱ्या अशा अनेक गाड्या आहेत की, त्यांना वेगवेगळ्या छोट्या स्थानकात थांबा मिळणे आवश्यक असून तशी मागणीही जोर धरू लागली आहे.
बॉक्स 1
सध्या धावत असलेल्या रेल्वे :
पुणे स्थानकावरून प्रवास सुरू करणाऱ्या जवळपास ४० हून अधिक रेल्वे आहेत. तसेच पुणे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या अधिक आहे. यात डेक्कन, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंद्रायणी, पुणे-गोरखपूर, पुणे-हावडा, पुणे-बिलासपूर, पुणे-जयपूर, पुणे-नागपूर, पुणे / जम्मू तावी झेलम एक्सप्रेस, पुणे-लखनऊ आदी प्रमुख रेल्वेंचा समावेश आहे.
बॉक्स 2
या गाड्यांना चिंचवड स्थानकावर थांबा मिळणे गरजेचे
पुण्याहून वसई रोड मार्गे गुजरात, राजस्थान व दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांना तसेच पुण्याहून पनवेल मार्गे केरळ, कोकणात जाणाऱ्या गाड्यांना चिंचवड स्थानकावर थांबा मिळणे गरजेचे आहे. विशेषतः पुणे - जोधपूर, पुणे-अहमदाबाद, पुणे-निझामुद्दीन, पुणे-जोधपूर, पुणे-वेरावल, पुणे-गांधीनगर, पुणे-अजमेर आदी गाड्यांना चिंचवड स्थानकावर थांबा मिळणे आवश्यक आहे.
कोट
पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चिंचवड स्थानकावर थांबा नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना पुणे स्थानकावर उतरून चिंचवडला जावे लागत आहे. गुजरात, राजस्थान तसेच केरळला जाणाऱ्या गाड्यांना एक मिनिटांचा जरी चिंचवड स्थानकावर थांबा दिला, तर प्रवाशांची मोठी सोय होईल.
-हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे
कोट 2
पूर्वीच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्के प्रवासी रेल्वे गाड्या धावत आहेत. ते देखील विशेष दर्जाच्या गाड्या आहेत. कोरोना काळात प्रवासी संख्या मर्यादित राहावी म्हणून काही गाड्यांचे थांबे रद्द केले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ते थांबे पूर्ववत करण्यात येईल.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे