इंदापूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपाच्या प्रवक्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि.११) रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने इंदापूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. इंदापूर शहर बंदला शहरातील नागरिक, व्यापारी व दुकानदार यांनी चांगला प्रतिसाद दिला.
इंदापूर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शक्रवारी इंदापूर निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना निवेदन देऊन मुस्लीम समाजाच्या सामाजिक भावना भडकावणार्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी सकाळपासून शहरातील सर्व व्यापारी, नागरिक व दुकानदार यांनी दुकाने बंद ठेऊन बंदला पाठिंबा दर्शविला.
शनिवारी सकाळपासून इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठ, पूणे सोलापूर हायवे रोडवरील फ्रुट स्टाॅल, हाॅटेल्स, दुकाणे, चाळीस फूटी रोड,बारामती रोडवरील सर्व दुकाणे बंद ठेवण्यात आली होती. बंदमुळे रस्ते निर्मनुष्य व बाजारपेठेत सर्वत्र शांततामय वातावरण दिसून येत होते. तर इंदापूर पोलीस प्रशासनाकडून कडक व चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने इंदापूर शहर बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर यांनी दिली.
इंदापूर शहरातील बाजारपेठा व दुकाने पूर्णपणे बंद असल्याने बाहेरगावाहून येणार्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. बसस्थानक परिसरातील दुकाने, हाॅटेल्स बंद असल्याने नागरिकांना चहा, पाणी व नाष्टा यासाठी शहरात वणवण फिरून काहीच न मिळाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याने आनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.