पुणे : मागील अनेक महिन्यांपासून बंधपत्रित तत्त्वावर काम करणाऱ्या परिचारिकांना लवकरच नियमित सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकतेच दिले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले, सरचिटणीस कमल वायकोळे, खजिनदार सुमन टिळेकर, कार्याध्यक्ष वर्षा पागोटे व ललिता अटाळकर उपस्थित होत्या. याबाबत सुमन टिळेकर म्हणाल्या, ‘आमच्यातील अनेक परिचारिकांची २० ते २५ वर्षे सेवा झाली असतानाही आम्हाला परीक्षा देऊन सेवेत नियमित करण्यास सांगितले जाते. ही मागणी आम्हाला मान्य नसून जुन्या नियमाने ज्या परिचारिका आहेत त्यांना परीक्षा द्यायला लागू नये. आम्हाला इतका अनुभव असताना परीक्षेवरून आम्हाला वरिष्ठ पद देणार हे अतिशय अन्यायकारक आहे.’ निवृत्तीचे वय आले असताना अशाप्रकारची परीक्षा द्यायला लावणे चुकीचे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
परिचारिकांना नियमित सेवेत घेणार
By admin | Published: July 25, 2016 2:28 AM