मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टरांची अनुपस्थिती असल्याने येथील परिचारिकाच रुग्णावर उपचार करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. परिसरातील रुग्णांच्या अशा तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे डॉक्टर शशिकांत माने यांची बदली करा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.शुक्रवारी (दि. ११) रात्री साडेआठला करंजावणे येथील शंकुतला बारीकराव शिंदे (वय ६५) यांना काही तर चावले; म्हणून उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे या ठिकाणी कामावर हजर असलेल्या परिचारिकेने औषधोपचार केले. पण, जर सर्पदंश झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. अशा केसेस करंजावणे येथे वारंवार घडत आहेत; पण रात्रीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नसतात. या ठिकाणी असलेले डॉक्टर शशिकांत माने यांच्या बाबतीत जास्त तक्रारी आहेत. सकाळी उशिरा येणे आणि सायंकाळी लवकर घरी जाणे, रात्रीच्या वेळी डॉक्टर शशिकांत माने उपचार करण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात, अशा तक्रारी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या आहेत.वेल्हे तालुक्याच्या भौगोलिक स्थितीनुसार दोन भाग पडतात. वेल्ह्यापासून अंबवणेपर्यंत आणि वाजेघर, लव्ही, मेरावणे, गुंजवणे, चिरमोडी, सोंडे सरपाले, वडगाव आदी गावे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवंलबून आहेत. या केंद्राची इमारत अद्ययावत बांधली असून सर्व उपकरणे आधुनिक पद्धतीची आहेत. दररोज सकाळी येथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे; पण डॉक्टर शशिकांत माने यांच्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. रुग्णालादेखील ते व्यवस्थित सेवा देत नसून लोकांनी दूरध्वनीवर संपर्क साधल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे डॉक्टर शशिकांत माने यांची बदली करा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)
परिचारिकाच करतात उपचार
By admin | Published: March 13, 2016 1:27 AM