राजगुरूनगर (पुणे) : राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या माध्यन्ह शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे. ही घटना (दि ९ रोजी ) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. शाळेतील सुमारे ५३ मुलांना ही विषबाधा झाली असून दरम्यान, आहार खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि पोटदुखी इतर त्रास जाणवू लागल्याने शिक्षकांच्या लक्षात आले. त्रास होणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना तातडीनं चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हुतात्मा राजगुरु विद्यालयातील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारतून दुपारी भात देण्यात आला होता. या भाताला साबणाचा उग्र वास येत होता. विद्यार्थ्यांनी तो खाल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी हा प्रकार सुरू झाला. शिक्षकांनी तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
चांडोली रुग्णालयात विद्यार्थ्यांना तातडीने उपचार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पुनम चिखलीकर यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांची विचारपूस केली.