पुणे : संक्रांत आली की, पतंगबाजी करण्यासाठी मुलांची चढाओढ लागते. पण अनेकण नायलॅान मांजा वापरत असल्याने त्यामुळे पक्षी त्यात अडकून जीव गमावत आहेत. शहरात सध्या या मांज्याने जखमी झालेले पक्षी पाहायला मिळत आहेत. ही पतंगबाजी पक्ष्यांचे आयुष्यच ‘कट’ करत आहे.
मकरसंक्रांतीपासून देशभरात पतंग महोत्सव सुरू होतो. परंतु अनेक वेळा सुटलेले पतंग व त्याचा धारदार मांजा टेकड्यांवर, जंगलात झाडा-झुडपात किंवा मोकळ्या मैदानात तारांवर अडकतो. अनेकदा पक्षी या मांज्यात अडकून जखमी होतात किंवा प्राणास मुकतात.
टेलस ऑर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट व जान्हवी बापट हे दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून संक्रांतीनंतर तळजाई परिसरात झाडावर अडकलेल, इतरत्र पडलेले मांजे उचलण्याचे काम करीत आहेत. तसेच अनेक पक्ष्यांना त्यांनी मांज्यातून सोडविले आहे. गेल्या काही दिवसात तळजाई टेकडी, वनविहार व इतर परिसरातून वीस ते पंचवीस पतंग व मांजा गोळा केले आहेत. या फासात अडकून जखमी झालेल्या घुबडे, कावळे, घारी, कोकीळ या पक्ष्यांना जीवदान दिले आहे.
सातभाईने घेतली पुन्हा भरारी
प्रशांत माखरे या तरुणाने इंदापूर परिसरातील मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांना जीवदान दिले. सातभाई पक्षी तर मांज्यात खूप अडकून एका फांदीला लटकलेला होता. संपूर्ण पंखाला आणि अंगाला मांजा गुंडाळला गेला होता. त्यातून प्रशांत याने त्या पक्ष्याला मोकळे केले आणि आकाशात भरारी घेण्यासाठी सोडले.
===================