पुणे : मकरसंक्रांतीला शहरात लहान मुलांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. परंतु, बहुतांश जणांनी पतंगासाठी नायलॉनचा मांजा वापरला आहे. हे तुटलेले पंतग सध्या शहरात अनेक झाडांवर लटकत आहेत. तळजाई टेकडीवरील झाडांवर प्रचंड प्रमाणात अडकलेले मांजे पहायला मिळाले. ते काढण्याचा प्रयत्नही काही नागरिकांनी केला आहे.
नायलॉन मांजांमुळे नागरिक व पक्षी जखमी होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील चोरीच्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री केली जाते. त्यातूनच सध्या नायलॉन मांजे सर्वत्र पहायला मिळत आहेत. त्याने मकरसंक्रांतीला अनेकजण जखमी झाले. त्यात दोन पोलीसांचाही समावेश आहे. तसेच पक्षी देखील त्यात अडकून जखमी झाल्याचे पहायला मिळाले. तळजाई परिसरातील झाडांवरील अडकलेले मांजा काढण्याचे काम टेल्स ऑर्गनायथेशनचे लोकेश बापट यांनी सोमवारी दुपारी केले. त्यांनी स्वत: अडकलेले पतंग काढले. त्यामध्ये बहुतांश मांजा नायलॉनचे आहेत. काही पतंग झाडांच्या अतिशय उंच भागावर अडकलेले आहेत. ते काढण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. मोठी काठी आणून त्याद्वारे ते काढण्यात येत आहेत.
दुष्परिणाम ओळखून नायलॉन मांजा बंद करणे आवश्यक
नायलॉन मांजा वापरून पतंग बराच काळ उडवता येतो, या धारणेमुळे त्यांचा वापर होतो. परंतु, नागरिकांनी त्याचे दुष्परिणाम ओळखून नायलॉन मांजा बंद करणे आवश्यक आहे. त्यावर बंदी घातलेली आहेच. लोकांनी ते वापरू नये. तरच पक्षी, नागरिक जखमी होणार नाहीत. - लोकेश बापट, टेल्स ऑर्गनायझेशन