पुणे : आपल्या मुलांना लहानाचे मोठे करताना जशी त्यांची काळजी घेतो, अगदी तसेच वृक्षांची काळजी घ्यावी, या उद्देशाने आदरवाडी (ता. मुळशी) या गावात अनोखा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षांना मुलांची नावे देऊन ते जपण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली असून, मुले मोठी झाल्यावर ते देखील त्यांच्या वृक्षांचे संवर्धन करणार आहेत.
वृक्षांचे संवर्धन व्हावे आणि त्यांची तोड होऊ नये म्हणून हा उपक्रम टेल्स या संस्थेतर्फे लोकेश बापट यांनी राबविला आहे. या उपक्रमाची सुरवात आदरवाडी येथून रविवारी करण्यात आली. या प्रसंगी अंकुश मोरे, संदीप बामगुडे, रामदास येनपुरे, नंदु शिंदे, सत्यवान बामगुडे, चंद्रकांत ढोकळे, शंकर मराठे, जयवंत चोरगे आदी उपस्थित होते. या वेळी सुमारे शंभरहून अधिक नावांची प्लेट झाडांवर लावण्यात आली. ती सर्व झाडे ग्रामस्थ आपल्या मुलांप्रमाणे जपणार आहेत.
बापट म्हणाले,‘‘सध्या ‘विकासा’च्या नावाखाली वृक्षतोड होत आहे. त्यामुळे हवामानावर परिणाम होत आहे. वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविला. जर आपल्या मुलाचे नाव त्या वृक्षाला असेल, तर त्यावर कोणीही कुऱ्हाड चालवणार नाही. मुलांमध्येही आपल्या नावाचा वृक्ष पाहून त्याचे संवर्धन करण्याची भावना निर्माण होणार आहे.
—————————-
आदरवाडी परिसरातील अनेक गावांमध्ये आम्ही कुऱ्हाडबंदी केली आहे. झाडांना वाचवणे आवश्यक आहे. ताम्हिणी परिसर वनसंपदेने संपन्न आहे. या वनांमधून अनेक औषधी वनस्पतींपासून रोजगार मिळू शकतो. त्यासाठी फक्त स्थानिकांना योग्य ते मार्गदर्शन दिले पाहिजे.
- अंकुश मोरे, सामाजिक कार्यकर्ते
————————-
झाडं लावणं आनंददायी
पिंपळ, कडूलिंब आणि वड यापैकी कोणताही एक वृक्ष किंवा चिंचेची दहा झाडे, कवठ, बेल किंवा आवळा यापैकी कोणतेही तीन वृक्ष जो लावेल, त्याचे आयुष्य सुखमय, आनंददायी होईल, असे महर्षी वेद व्यास यांनी ‘भविष्यपुराणा’त नमूद करण्यात आले आहे. प्राचीन काळी निसर्ग समृध्द असतानाही वृक्षांचे महत्त्व सर्वांना माहित होते. निसर्ग जपण्यासाठी तेव्हा प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे आज तर वृक्ष संवर्धनाची नितांत गरज आहे.