उरुळी कांचन - सोरतापवाडी गट
उरुळी कांचन : जिल्हा परिषद गट उरुळी कांचन व पंचायत समिती गण उरुळी कांचन हा इतर मागास वर्गीय (ओबीसी) महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने व त्या जागांसाठी सर्वच पक्षांकडे कुणबी दाखला मिळवलेल्या मराठा समाजातील इच्छुकांनी मागणी करून प्रबळ दावा ठोकला आहे. त्याला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न उरुळी कांचन गटातील ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींच्या तरुणवर्गाने केला आहे.उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी व उरुळी कांचन गणासाठी असे दोन ओबीसी उमेदवार व सोरतापवाडी गणातून एक सर्वसाधारण महिला असे ३ उमेदवार कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली न जाता, ओबीसीमधील कुणबींच्या विरोधात लढा देण्याचे सर्व समाजबांधवानी मिळून एकमुखाने ठरविले आहे. बुधवारी (दि. १८) येथील श्रीराम मंदिरामध्ये याबाबत बैठक घेण्यात आली. यामध्ये ११ जणांची एक समन्वय समिती बनवून त्यांच्या नियंत्रणाखाली पुढील रणनीती आखण्याचे ठरविले आहे. ओबीसीच्या जागेसाठी ओबीसीचा उमेदवार व जनरल महिलेच्या जागेसाठी जनरल महिलेलाच उमेदवारी देण्याचा व त्यांनाच मतदान करण्यासाठी ठरविण्यात आले आहे. याच पद्धतीने सर्व समाज एकसंध ठेवून सर्वधर्मसमभाव हे धोरण ठेवण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. ओबीसी कुणबी सोडून प्रत्येक घटकातील कमीत कमी एक प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होता. या प्रसंगी काँग्रेस आयचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, शरद वनारसे, यशवंतचे माजी संचालक बापूसाहेब बोधे, विकास जगताप, जयप्रकाश बेदरे, राजेंद्र टिळेकर, रोहित ननावरे, भगवान जाधव, मिलिंद जगताप, धनंजय दीक्षित, चंद्रकांत खोमणे, अनिल कुंभार, बाळा बडेकर, लक्ष्मण जगताप, मोहन जाधव, मोहन ताम्हाणे, दिलीप लोंढे, अमिन शेख, संजय वनारसे, संजय गायकवाड आदी प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)