पुणे : जागे होण्याची वेळ येऊनही ओबीसी समाज झोपलेला आहे. त्याला जाग आणण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केली. ओबीसी सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अधिवेशन येथे झाले. स्वागताध्यक्ष विठ्ठल सातव, सचिव दिगंबर लोहार, उपाध्यक्ष मोहन देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. भगवानराव बिडवे, प्रतिमा परदेशी, मृणाल ढोले-पाटील, जगन्नाथ लडकत, समीर घाडवे, चंद्रकांत बावकर, तेजल राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. स्मरणिका प्रकाशन व ‘अज्ञानाचे बळी’ या प्रदीप ढोबळे लिखित तसेच ‘आरक्षणाचे राजकारण’ या रमेश भोजलिखित पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.क्रिमीलेअरची अट घालण्यात आल्याने ५० टक्के ओबीसींना सवलती मिळत नाहीत, त्यामुळे ही अट रद्द केली जावी, अशी मागणी विठ्ठल सातव यांनी केली. सध्याचा काळ ओबीसींना अडचणीचा असल्याचे सांगून भगवानराव बिडवे म्हणाले, बलुतेदारांनी ओबीसी ही एकच जात मानून संघटित व्हावे.चंद्रकांत बावकर यांनी इबीसी सवलतीमुळे मराठा समाजाचा आर्थिक प्रश्न मार्गी लागल्याचे नमूद केले. नितीन बुटी, महेंद्र धावडे, बापू राऊत, तेजल राऊत आदींचीही भाषणे झाली. गौरव उबाळे यांना ओबीसी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सुमनताई पवार, प्रल्हाद वडगावकर, संजय राजे यांनाही ओबीसी जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हाध्यक्ष रमेश भोज यांनी संघटनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. योगेश ढगे, राखी रासकर, नंदा करे, लक्ष्मी भोज, दिलीप शिंदे, आदींनी संयोजन केले. संदीप थोरात, रवी चौधरी, नजीरभाई शेख आदी उपस्थित होते.
ओबीसींना जाग आणण्याची गरज
By admin | Published: October 24, 2016 1:27 AM