पिंपरी : हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीतील काही मजकुरावर आक्षेप घेत त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार ‘हिंदू’कार लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १०) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. रमेश खेमू राठोड (वय ३५, रा. शांती नगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यामुळे जाती व समाज यांच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.
अॅड. राठोड म्हणाले, भालचंद्र नेमाडे यांनी पुस्तकात समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक माघारी घ्यावे. तसेच नेमाडे यांनी लमाण समाजाची माफी मागावी. अन्यथा समाजातर्फे आंदोलन करण्यात येईल.