लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सहा मीटरचे रस्ते ९ मीटर रुंद करण्यास हरकती-सूचना मागविण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली़
शहरात अनेक ठिकाणी कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरता येत नसल्याने, या ठिकाणच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शहरातील पेठा आणि मध्यवर्ती भागातील रस्ते कमी रुंदीचे असल्याने इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नसुध्दा प्रलंबित होता. परंतु, आता शहरातील ६ मिटर रुंदीचे ३२३ रस्ते ९ मिटर रूंद करण्यासाठी हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यास परवानगी दिल्याने सदर रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान स्थायी समितीने ३२३ रस्त्यांसह शहरातील सर्वच छोट्या रस्त्यांच्या रुंदीकरणास यापूर्वीच संमती दिली आहे़
पुणे शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी ६ मिटर व ९ मिटर रस्त्यांचे रुंदीकरण २१० अंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने सुध्दा सुधारित बांधकाम नियमावलीमध्ये याला सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे शहरातील रखडलेला विकास, बांधकाम प्रकल्प यांना चालना मिळेल व पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न यामुळे सुटण्यास मदत होईल. त्यातून शहराचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे़
-----------------------------------