पुणे : पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासह संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या ४६० हेक्टरपैकी ४५२ हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून, उर्वरित आठ हेक्टर जमीनही लवकरच ताब्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. त्यानुसार हडपसर ते दिवे घाट या रस्त्याचे कामही आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत हा मार्ग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या दोन्ही मार्गांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२१ रोजी झाले होते. त्यानंतर या मार्गांच्या भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. त्यासाठी थेट खरेदी योजना राबविण्यात आली. या दोन्ही मार्गांसाठी जिल्ह्यातील ४६० हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. त्यानुसार आतापर्यंत ४५२ हेक्टर भूसंपादन झाले आहे. उर्वरित आठ हेक्टरही लवकरच ताब्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यात पुढाकार घेत हे भूसंपादनाचे काम मार्गी लावत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा २३४ किलोमीटरचा असून त्याचे सहा टप्पे आहेत. यासाठी सुमारे ७ हजार ५१६ कोटींचा खर्च येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे काम करत आहे. त्यातील पाच टप्प्यांचे काम सुरू झाले आहे. सहावा टप्पा हडपसर ते दिवे घाट असून येथील संपूर्ण जमीनही ताब्यात आली आहे. त्यामुळे या सहाव्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. या भूसंपादनाचे निवाडे जाहीर झाले असून जमीनमालकांना मोबदलाही देण्यात आला आहे. हा मार्ग हडपसर - दिवे घाट - लोणंद - धर्मपुरी - खुडूस - वाखरी - मोहोळ असा असेल. हा मार्ग चार पदरी असून, तो भारतमाला प्रकल्पातून राबविण्यात येत आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३० किलोमीटरचा असून, याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यासाठी ४ हजार ४१५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. यातील देहू ते हडपसर हा मार्ग दोन्ही महापालिकांच्या हद्दीतून जात आहे. हा शहरी मार्ग असल्याने तो सुधारण्याबाबत महापालिका व राज्य सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. हडपसर ते कासुर्डी हा राष्ट्रीय महामार्ग ६५ असून हा मार्ग चारवरून सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. तर कासुर्डी ते पाटस हा मार्गही चार पदरी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याचा पालखी मार्गात समावेश केलेला नाही. पालखी मार्गात पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर व इंदापूर ते तोंडले बोंडसे अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे.
या दोन्ही मार्गांसाठी जिल्ह्यातील ४६० हेक्टर जमिनीपैकी ४५२ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे काम करत आहे. हडपसर ते दिवे घाट या मार्गासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध होणार आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे