यवत : पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील गावकामगार तलाठ्याला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पारगाव येथील तलाठी कार्यालयात घडली.या प्रकरणी पारगाव येथील गावकामगार तलाठी कैलास एकनाथ बाठे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी : आरोपी संजय चंद्रकांत माळवे (रा. पारगाव, ता. दौड) यांच्या विरोधात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी गाव नमुना नं. २ मिळावा, अशी मागणी करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले, त्या वेळी तलाठ्यांनी तहसील कार्यालयात अर्ज करा, असे सांगितले या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचा गुन्हा यवत पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सरकारी कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल
By admin | Published: December 12, 2015 12:39 AM