१४ व्या वित्त आयोग निधी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत चाकण नगरपरिषदेच्या वतीने सध्या शहरातील ओढे व नाले सफाई स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील पठारवाडी भागातून भामा नदीला जाणाऱ्या ओढ्यात प्लॅस्टिकयुक्त कचरा साठल्याने दुर्गंधी सुटली होती.तसेच मैलामिश्रित सांडपाण्यावर फेस तयार झाला होता. हेच दुर्गंधीयुक्त फेसाळलेले सांडपाणी पुढे भामा नदीला जाऊन मिळत आहे. राक्षेवाडी, पठारवाडी या भागासह पुढे काळूस येथील अनेक नागरिक हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरतात. त्यामुळे हे पाणी पिणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
चाकण परिसरातील नैसर्गिक ओढे,नदी आणि नाले हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. मात्र, ते स्वच्छ ठेवण्याची मनोवृत्ती नसल्यामुळे त्यांची गटारे बनल्याचे चित्र चाकण पालिकेच्या हद्दीत व परिसरात हमखास पाहावयास मिळते. शहरातील तसेच परिसरातील काही ग्रामपंचायतने या ओढ्यात सांडपाणी व मैलामिश्रित पाणी सोडले आहे. मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या ओढ्यात आल्याने पाणी पुढे जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी चाकण नगरपरिषदेने सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प तयार करून या पाण्याचा पुनर्वापर करता येईल.
नगरपरिषद हद्दीतील ओढे-नाले साफसफाईचे काम केल्यामुळे पाण्यात अडकलेले प्लॅस्टिक कचरा बाहेर काढल्याने पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो. यामुळे मच्छर, डास व इतर सूक्ष्म किटाणूंचे प्रमाण खूप कमी होते. हवा प्रदूषणही कमी होते.यामुळे पठारवाडी येथे राहात असलेल्या नागरिकांना तसेच विविध पाळीव प्राण्यांनाही यामुळे त्रास होणे कमी होण्यास मदत होते. नगरपरिषदेने या वर्षी पुन्हा नालेसफाईचे काम हाती घेतल्याने शहरासह पठारवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चाकण शहरातील ओढा सफाई करताना.