पुणे : कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यचौकात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तब्बल तीस तासांनी मुंबईतील न्यायाधीश महिलेचा पती श्याम भदाणेसह मुलीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी वाहतूक हवालदार रवींद्र इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. कर्वे रस्त्यावरील स्वस्तिक चौकात बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इंगळे वाहतूक नियमन करीत असताना आरोपींनी नियमांचे उल्लंघन केले होते. त्या वेळी इंगळे यांनी पावती फाडण्यास सांगितल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाले होते. त्यानंतर इंगळे आणि भदाणे बाप-लेक यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. वाद झाल्यानंतर इंगळे यांनी पहिल्यांदा भदाणे यांच्यावर हात उचलल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे; परंतु भदाणे यांनीच इंगळे यांच्या अंगावर वाहन नेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एरवी किरकोळ कारणावरून सर्वसामान्य नागरिकांवर सरकारीकामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाºया पोलिसांनी न्यायाधीश महिलेच्या पती आणि मुलीविरोधात सौम्य भूमिका घेतल्यामुळे अनेकांनी टीका केली होती. अखेर तीस तासांनंतर भदाणे यांच्यासह मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायाधीशांच्या पतीविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:20 AM