मंचर : बाजारतळ ओढ्यास पाणी सोडावे व डिंभे धरण उजव्या कालव्याच्या चारी क्र. २६ ला पाणी सोडावे, या मागणीसाठी बुधवारी (दि. १२) निघोटवाडी येथील डिंभे धरण पाटबंधारे उपविभाग क्र. २ कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले व शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात यांच्यासह १० ते १२ जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शाखा अभियंता व्ही. बी. हाडवळे यांनी सरकारी कामात अडथळा, तसेच काम करण्यास अटकाव केला, म्हणून रविवारी तक्रार दिली होती. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला गेल्या एक महिन्यापासून पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. डिंभे धरणापासून व शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी, कर्डिलेवाडीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ पिकांसाठी झाला. परंतु मंचर परिसरातील शेतकऱ्यांना चारी नं. २६ मधून पाणी देण्यास व बाजारतळ ओढ्यास पाणी सोडण्यास जलसंपदा विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते, म्हणून बुधवारी सकाळी १० वाजता राजाराम बाणखेले, दत्ता थोरात यांच्यासह १० ते १२ शेतकरी निघोटवाडी कॉलनी येथे गेले. तेथील कार्यालयात अधिकारी नसल्याचे पाहून कर्मचारी निवृत्ती भगवान टाकळकर आणि झुंबर काशिनाथ केदारी यांना संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाबाहेर काढून संबंधितांनी कार्यालयाच्या दरवाजास कडी लावली. याप्रकरणी शाखा अभियंता व्ही. बी. हाडवळे यांनी सरकारी कामात अडथळा आणला व काम करण्यास अटकाव केला, अशी तक्रार वरिष्ठांच्या आदेशानुसार रविवारी (दि. १६) मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार राजाराम बाणखेले, दत्ता थोरात यांच्यासह अंदाजे १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गोडसे करीत आहेत. (वार्ताहर)
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा
By admin | Published: April 18, 2017 2:33 AM