पुणे : मराठी न्यूज चॅनेलवरील लाईव्ह प्रसारणा दरम्यान लाईव्ह चॅटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने खोटे खाते तयार करुन त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संबंधी आक्षेपार्ह बीभत्स मजकूर प्रसारित करुन बदनामी करणार्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाहक महेश संभाजी करपे (वय ५०, रा़ चंदननगर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनेलच्या लाईव्ह प्रसारणादरम्यान बातम्याच्या खाली लाईव्ह चॅटमध्ये १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनेलचे लाईव्ह प्रसारण सुरु होते. यावेळी बातम्यांच्या दरम्यान खाली लाईव्ह चॅट या सदरात आर एस एस संघराज या बनावट खातेधारकाने फिर्यादी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावे खोटे खाते तयार करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांचे संबंधाने आक्षेपार्ह, बीभत्स मजकूर व राष्ट्रपुरुषांचे बाबतीत खोटा इतिहास प्रसारित केला. त्याद्वारे त्यांची बदनामी करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जनमानसात गैरसमज पसरवून दोन वर्गांमध्ये द्वेष भावना पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक माळी अधिक तपास करीत आहेत.