लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी आता महापालिकेकडे पुकारा सुरू केला आहे. काही गावांना एक, तर काही गावांना दुसरा न्याय, असा प्रकार महापालिकेकडून झाला असून त्याविरोधात आता पाणीपुरवठा होणार नसलेल्या गावांचे सरपंच महापौरांची भेट घेणार आहेत. महापालिका हद्दीलगतच्या साधारण ५ किलोमीटर परिघातील गावांना महापालिकेने पाणीपुरवठा करावा, त्यासाठी त्या महापालिकांकडून पैसे आकारावेत, असे राज्य सरकारने महापालिकेला कळवले आहे. त्यानुसार महापालिका काही गावांना पाणीपुरवठा करीत असते. केशवरनगर, साडेसतरा नळी, महादेवनगर व मांजरी या चार ग्रामपंचायतींना मध्यंतरी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नव्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मंजुरी देण्यात आली.मात्र, या चार गावांसह नऱ्हे, आंबेगाव, सूस, पाषाण अशा काही गावांचीही त्यांना महापालिकेने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होती. त्याचा विचारच महापालिकेने केलेला नाही. या गावांनाही पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सर्वपक्षी नगरसेवकांनी केली होती. ती फेटाळल्यामुळे आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे या गावांमध्ये जवळीक असलेले काही नगरसेवकही नाराज झाले आहेत. या गावांमधील सरपंच महापालिकेत महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या गावांचाही समावेश महापालिका पाणीपुरवठा करणार असलेल्या गावांमध्ये करावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती मिळाली.
पिण्याच्या पाण्यासाठी हद्दीलगतची गावे आर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 3:00 AM