पिंपरी : महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला नगरसेवकांनी तब्बल २५६ विषयांच्या सात उपसूचना देण्यात आल्या. प्रशासनाकडून अभ्यासपूर्वक अंदाजपत्रक तयार केले जात असताना शेकडो उपसूचना जोडल्या गेल्याने निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच नगरसेवकांनी प्रभागातील छोटी-मोठी कामेदेखील यामध्ये घुसडली असल्याची चर्चा आहे. महापालिकेला वर्षभरात मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन यासाठी प्रशासनाकडून दर वर्षी अंदाजपत्रक तयार केले जाते. यासाठी दोन महिने अगोदरच प्रशासनाची तयारी सुरू असते. अधिकाऱ्यांना प्रभागातील कामांची आणि नियोजित प्रकल्पांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या जातात. अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी महापालिका आयुक्तांकडून कनिष्ठ अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंता, तसेच इतर विभागांच्या अधिकाऱ्यांच्याही बैठका घेतल्या गेल्या. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रभागातील कामांबाबत माहिती घेतली जाते. कोणते काम प्राधान्याने करावे लागेल, नवीन काम करणे आवश्यक आहे, याचा आढावा घेतला जातो. लोकप्रतिनिधींचे म्हणणे जाणून घेतले जाते. त्यानुसार अंदाजपत्रकात कामांचा अंतर्भाव करून अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. मात्र, तरीही स्थायी समितीकडून महासभेपुढे ठेवण्यात आलेल्या अंदाजपत्रकास नगरसेवकांकडून शेकडो उपसूचना दिल्या जातात. यंदा महापालिकेच्या आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या ३ हजार ९८२ कोटी ५२ लाखांच्या अंदाजपत्रकास नुकतीच सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. त्यामध्ये नगरसेवकांनी सात उपसूचनांच्या माध्यमातून तब्बल २५६ कामांचे विषय दिले. यामध्ये तरतुदींची फेरफार, नवीन कामे सुचविणे आदींचा समावेश होता. प्रशासनाने केलेल्या अंदाजपत्रकात बऱ्याच कामांचा समावेश असला, तरी नगरसेवकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभागातील कामेदेखील मार्गी लावण्याचा आग्रह धरल्याचे उपसूचनांवरून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
अधिकारी ‘अ’ज्ञानी
By admin | Published: April 09, 2016 1:45 AM