पाटस : खडकवासला धरणातून दौंड तालुक्यासाठी सोडलेल्या पाण्याचे नियोजन ठरलेले असताना पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने अगोदरच दौंड पूर्व भागाचे पाणी पळविले. त्यामुळे या भागातील सिंचनाचे वेळापत्रकच कोलमडून गेल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याविरोधात पाटबंधारे विभागाच्याच दुसऱ्या अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.पाटस (ता. दौंड) येथील खडकवासला पाटबंधारे उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी काशिनाथ देवकाते यांनी पाटस हद्दीतील वितरिका, उपवितरिका आणि तलावाचे दरवाजे मध्यरात्री उघडले. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील सिंचनव्यवस्था पूर्णपणे बंद झाली आहे. संबंधित अधिकाऱ्याची तक्रार खडकवासला पाटबंधारे विभागाचे अभियंता रवी जाधव यांनी वरिष्ठांकडे केली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, खडकवासला कालव्याअंतर्गत खडकवासला धरणातून पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यात आले आहे. हे पाणी ‘टेल टू हेड’ (शेवटापासून ते सुरुवातीकडे) असे सोडण्यात आले आहे. प्रथम पाणी इंदापूर तालुक्याला सोडण्यात आले. त्यानंतर ३१ मे रोजी इंदापूरचे पाणी संपून ते १ जूनला दौंड तालुक्याच्या पूर्व भागापासून सुरू करण्यात आले होते. दौंड तालुक्यात पाणी वाटपाचे तीन विभाग केले आहेत. प्रथम दौंड पूर्व भाग, नंतर पाटस मध्यभाग आणि शेवटी यवत परिसर असे नियोजन असते. पाटसला पाणी सोडण्यास अजून तीन चार दिवस बाकी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास पाटस उपविभागाच्या हद्दीतील वितरिका, उपवितिरिका तलावाचे दरवाजे वरिष्ठांची कुठलीही पूर्वसूचना न घेता प्रभारी उपविभागीय अधिकारी काशिनाथ देवकाते यांनी उघडले. त्यामुळे पूर्व भागातील पाणी पहाटेच्या वेळी बंद होवून ते पाटसला गेले. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी अभियंता रवी जाधव यांच्याकडे याबाबत तक्रार करून असंतोष व्यक्त केला. त्यामुळे जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. वाढते तापमान, जळून चाललेली पिके, पिण्याच्या पाण्याचे आटलेले स्रोत, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असताना असा निष्काळजीपणाचा प्रकार घडणे चुकीचे आहे. उन्हाळी आवर्तनाचे नियोजन ठरल्याप्रमाणे सुरू होते; मात्र या घटनेमुळे ते विस्कळीत झाले आहे. तर पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. या संदर्भात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार, अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्याकडे तक्रार केली आहे. (वार्ताहर)
अधिकाऱ्यानेच पाणी पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2015 4:25 AM