लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : थकबाकी न भरणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलची वीजजोड तोडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली. वीजजोड तोडल्यास बदली करण्याची धमकीही दिल्याने, शासकीय कामात अडथळा आणल्याच्या नियमानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ संपत शिवराम चौधरी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अविनाश ज्ञानोबा ताम्हाणे (रा. ताम्हाणेवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने १ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार गेले १५ दिवसांपासून वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांची वीज बंद करून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
याअनुषंगाने शनिवारी (दि.२०) सकाळी ११ च्या सुमारास चौधरी यांचे समवेत थेऊर कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सुरेश दगडुजी माने तसेच बाह्यस्राेत तंत्रज्ञ किरण बाळासाहेब झेंडे हे राजाराम उद्धव कुंजीर यांच्या थेऊरफाटा, कुंजीरवाडी येथील हॉटेलचे २५ हजार ३४० रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने कारवाई करण्यासाठी गेले होते.
हॉटेलचे मालक राजाराम कुंजीर यांचा मुलगा अविनाश कुंजीर यांच्या समक्ष वीजजोड तोडत असताना दोन वर्षांपासून हॉटेल चालविणारे अविनाश ताम्हाणे तेथे पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरूवात करून तुम्ही वीज कशी कट करता, तुमचेकडे बघतो, तुम्हाला कुठे तक्रार करायची तेथे करा. असे म्हणून चौधरी यांना धक्काबुक्की केली. तसेच तुमचे काही महिने राहिले आहे. परिसरातील नागरिकांच्या सह्या घेऊन तुमची बदली करेन, अशी धमकीही त्याने चौधरी यांना दिली. चौधरी हे त्याला आम्ही आमचे काम करत आहोत, असे म्हणाले असता ताम्हाणे हा त्यांच्या अंगावर मारण्यास धावून आला. यामुळे त्यांनी ताम्हाणे याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणून शासकीय काम करून दिले नाही म्हणून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.