पुणे : शहरातील मोठ्या प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती करून कोट्यवधींचा चुराडा करण्याऐवजी महापालिकेतील १५ ते २० तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे स्वतंत्र नियोजन, विकास व संशोधन विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रकल्पांचे तज्ज्ञ अधिकारीच सल्लागार होणार आहेत. महापालिकेकडून वाहतूक, जलशुद्धीकरण, मलनि:सारण व उड्डाणपूल आदी मोठे विकास प्रकल्प उभारले जातात. प्रकल्प निर्दोष होण्यासाठी निविदा मागवून सल्लागारांची नियुक्ती (कन्सल्टंट) केली जाते. सल्लागारांवर प्रकल्पाच्या सुमारे ३ ते ५ टक्क्यांप्रमाणे कोट्यवधीचा खर्च दरवर्षी होतो. तरीही महापालिकेचा हडपसर, विद्यापीठ, सिंहगड रस्ता, संचेती व धनकवडी उड्डाणपुलात अनेक त्रुटी व चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे सल्लागारांना कोट्यवधी रुपये देऊनही प्रकल्प सदोष होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी महापालिकेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे स्वतंत्र सल्लागार विभाग तयार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे. महापालिकेत वाहतूक, नगररचना, पाणीपुरवठा, उद्यान व बांधकाम विषयांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात संबंधित तज्ज्ञ अधिकारी महापालिकेच्या प्रकल्पांना सल्ला देण्याऐवजी प्रशासकीय कामात गुंतले आहेत. शिवाय महापालिका अधिकाऱ्यांचे काम सोपे होण्यासाठी निविदा मागवून सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाते. त्यासाठी दरवर्षी विविध प्रकल्पावर कोट्यवधीचा खर्च होतो. मात्र, संबंधित सल्लागार कंपनी प्रकल्पाच्या त्रुटीची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे सल्लागारांऐवजी महापालिकेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा स्वतंत्र सल्लागार विभाग तयार करण्याची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पालिकेच्या प्रकल्पांना अधिकारीच सल्लागार!
By admin | Published: April 20, 2015 4:31 AM