- मंगेश पांडे, पिंपरीएकीकडे अधिकारी ऐकत नाहीत, तर दुसरीकडे पक्षातून होत असलेली कोंडी यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे अस्वस्थ झाल्या आहेत. पद असले, तरी ते केवळ शोभेसाठीच आहे की काय, अशी परिस्थिती आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत पिंपळे गुरव प्रभागातून नगरसेवकपदी निवडून आलेल्या शकुंतला धराडे यांना राखीव जागेसाठी आरक्षित असलेल्या महापौरपदी संधी मिळाली. राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महापौरपदाची सूत्रे त्यांनी १२ सप्टेंबर २०१४ ला हाती घेतली. सुरुवातीला त्यांनी सर्वांच्या म्हणण्यानुसार कारभार सुरू ठेवला. साध्या पण तितक्याच कडक स्वभावाच्या, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. एकहाती सत्ता असल्याने सभागृह चालविणे अथवा इतर कामकाज चालविणे यामध्ये त्यांना फारशा अडचण येणार नव्हती, हे निश्चित होते. मात्र, नंतरच्या कालावधीत त्यांना पक्षातून अडचण निर्माण होऊ लागली. त्यामध्ये मग पक्षबैठक असो की, इतर कोणताही निर्णय, आदींचा समावेश आहे. महापौर धराडे या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या मानल्या जातात. मात्र, जगताप यांनी भाजपशी जवळीक साधल्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धराडे यांच्याशीही थोडे वेगळेपणाने वागण्यास सुरुवात केली. महापालिकेतील जगताप विरोधी गट महापौरांपासून तसे दूरच राहिले. दरम्यान, प्रशासनावर अगोदरपासूनच वचक असणारे नदीच्या अलीकडील पक्षाचे नेत्यांचे कदम आणि बहल यांचे आजही अधिकारी ऐकतात. तर दुसरीकडे पद असूनही धराडे यांचे बोलणे मनावर घेतले जात नाही. एखाद्या प्रश्नी अधिकाऱ्यांना बोलावून पोटतिडकीने प्रश्न मांडतात. तेवढ्यापुरते अधिकारीदेखील हो, हो म्हणतात. मात्र, नंतर महापौरांच्या आदेशाकडेच दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. याबाबत महापौरांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.दोन आठवड्यांपूर्वीच आयुक्त कोणतीही कल्पना न देता मुंबईला गेले. दुसऱ्या दिवशी बैठक असताना आदल्या दिवशीच मुंबईला जाण्याचे काय कारण होते, असे महापौरांचे म्हणणे होते. याबाबतही त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. असे प्रकार वारंवार घडत आहेत. महापौर बदलाची चर्चामहापौर पदाचे आरक्षण अडीच वर्षांसाठी आहे. मात्र, या काळात सव्वा वर्षांसाठी दोन महापौरांना संधी देण्यात येणार आहे. तसेच, धराडे यांना एक वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे महापौर बदलाची चर्चा सुरू आहे. शिक्षण मंडळ निवडणुकीमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांना संधी मिळाली. त्यामुळे महापौर पद कोणत्या गटाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.
अधिकारी ऐकत नाहीत; पक्षातही कोंडी
By admin | Published: October 10, 2015 5:12 AM