पिंपरी : थेरगाव येथील निवडणूक विभागाच्या मतदारनोंदणी कार्यालयातील लिपिकाला ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदार नोंदणीत अधिकाऱ्यांचा हात आहे. प्रामुख्याने पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंद होत आहेत, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.महापालिकेत निवडणूक विभागात काम करणाऱ्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांशी हितसंबंध आहेत. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारनोंदणी केली जात आहे. याची दखल घेण्याबाबतचे पत्र खासदार बारणे यांनी २६ सप्टेंबर २०१६ ला राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांना दिले होते. मात्र, त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे थेरगाव येथे मतदारयादीतील त्रुटी न काढण्यासाठी लिपिकाला लाच देण्याचा प्रकार घडला. शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारनोंदणी या अगोदरही झाल्याचे उघड झाले असून, पिंपरी व चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये या अगोदर बोगस आणि दुबार मतदार एक लाखापेक्षाही अधिक होते. त्यांची नावे कमी केली असली, तरी हजारो बोगस मतदारांची नोंदणी केली जात आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनी राज्य निवडणूक आयोग, महापालिका आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने झालेल्या मतदार नोंदणीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बारणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
बोगस मतदार नोंदणीत गुंतले अधिकारी -श्रीरंग बारणे
By admin | Published: November 17, 2016 3:13 AM