पिंपरी : कोणताही राजकीय वारसा नाही, कधी सामाजिक कार्यात सहभाग नाही, केवळ उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा या ओळखीवर महापालिका निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी एका तरुणाने केली आहे. तर रेशनिंग कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, आरटीओ कार्यालयातील दलाल यांनाही नगरसेवक होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. त्यांची फ्लेक्सबाजी सुरू आहे. निवडणूक लढण्यासाठी अगोदर नागरिकांचा संपर्क असणे गरजेचे असते. नागरिकांची कामे करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वर्षानुवर्षे सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नागरिकांची कामे केल्यानंतर राजकीय अभिलाषा बाळगण्यास हरकत नाही. त्या कामाची पावती मिळणेही सुलभ होते. असे काहीही न करता, नागरिकांमध्ये स्वत:ची प्रतिमा तयार झालेली नसताना, अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी एकाने केली आहे. रिक्षावर स्वत:ची छबी झळकावून निवडणुकीस इच्छुक असल्याचे प्रदर्शन केले आहे. महापालिकेत उच्च पदावर काम करणाऱ्या वडिलांची पुण्याई, त्यांनी केलेली बक्कळ कमाई या जोरावर या महाशयांना महापालिका निवडणूक सापी वाटू लागली आहे. रेशनिंग कार्यालय, आरटीओ, तसेच उपनिबंधक कार्यालयात दलाल म्हणून काम करणाऱ्यांपैकी काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. उत्पन्नाचे कोणतेही शाश्वत स्रोत नाही, अशा परिस्थितीत विविध कार्यालयांतील दलालांनी निवडणूक लढण्याची इच्छा बाळगली आहे. काही कार्यालयांमध्ये तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना हुशार अधिकाऱ्यांनी चक्क दलाल म्हणून कामाला लावले आहे. कामाचा मोबदला रकमेच्या स्वरूपात घेताना, लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकू नये, याची दक्षता म्हणून समाजात वावरणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्तेच काही शासकीय कार्यालयांमध्ये मध्यस्थाचे काम करत आहेत. कमिशनच्या स्वरूपात मिळणारा मोबदला बक्कळ असल्यानेच निवडणूक लढण्याच्या दलालांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अशा दलालांनी विविध राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंगसुद्धा लावली आहे. निवडणूक नागरिकांसाठी काय काम केले त्यावर अवलंबून नसून केवळ पैशांवर अवलंबून आहे. असा त्यांनी समज करून घेतला असल्याने निवडणुकीच्या रिंगणात अशाच लोकांची गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)
अधिकारीपुत्र, एजंट निवडणूक रिंगणात?
By admin | Published: January 11, 2017 3:10 AM