पुणे : युद्ध संपल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना काही काळ मदतीचा ओघ सुरू राहतो. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दत्तक घेऊन कायमस्वरूपी मदत मिळावी, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील ११५ शहीद कुटुंबीयांचा मेळावा उद्या महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेत भरविण्यात आला आहे.दहशतवादी हल्ला झाला की शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अनेक हात सरसावतात. मात्र, त्यांचा मदतीचा ओघ हा काही काळापुरतातच असतो. मात्र, आयुष्यभर त्यांना येणा-या समस्यांसाठी कोणी पुढे येत नाही. मदतीस्वरूपात मिळालेला पैसा हा काही काळापुरतातच असतो. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना येणारे प्रश्न हे जैसे थेच राहतात. मुलांचे शाळा-कॉलेज प्रवेश, मोठ्यांचे आजारपण, मिळालेल्या पैशाचे काय करावे याचे मार्गदर्शन, शेत जमिनीवरील अतिक्रमणे या सारख्या अनेक गोष्टी या केवळ पैशाने सुटू शकत नाहीत. त्यांच्या समस्येच्या काळात त्यांच्या मागे हक्काचा माणुस असणे गरचेचे असते. या हेतूने वरिष्ठ अधिका-यांनी पुढाकार घेत शहिदांच्या कुटुंबियांना कायमस्वरूपी मदत करण्याचे ठरवले आहे. सैनिक कल्याण कार्यालयातून जिल्ह्यातील जवळपास ११५ कुटुंबीयांची यादी करण्यात आली असून महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेत त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी पालक म्हणून त्या त्या कुटुंबीयांची जबाबदारी घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.>शहीद कुटुंबीयांना महसूलविषयक काही समस्या असतील, तर त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी कान्होराज बगाटे, संजीव पलांडे, रामदास जगताप या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक अधिकारी, पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी यांनी कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय डॉ. मनोज सबनीस, डॉ. प्रवीण जैन, डॉ. सचिन महाजन, डॉ. तुषार पाटील, डॉ. शिशिर जोशी, डॉ. नितीन कोलते आदी डॉक्टरांनीदेखील त्यांच्या सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मेळाव्यात जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर कामाची दिशाही निश्चित केली जाईल.- सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी
अधिकारी घेणार शहिदांच्या कुटुंबीयांना दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:37 AM