पुणे: विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. त्यात महायुतीतील भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात पुणे शहरातील चेतन तुपे, सुनील टिंगरे यांचा समावेश आहे. यावेळी तुपे आणि टिंगरे यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. अशातच त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. यावरून चेतन तुपे यांनी सीविक मिररशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
सोमवारी सकाळी अजित पवारांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली. यात संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांना उमदेवारीचा फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत. तसेच अर्ज भरताना काय काळजी घ्यावी, एवढेच सांगण्यात आले. परंतु अधिकृत एबी फॉर्म दिलेच नाहीत. असे तुपे यांनी सांगितले आहे.
हडपसर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडे आहे. महायुतीमधील शिवसेनेचा शिंदेगटही या जागेसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरचचंद्र पवार पक्षाकडे आहे; पण मविआतील शिवसेनेचा ठाकरे गट देखील ही जागा मागत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांना तयारी लागण्याचे आदेश पक्ष नेतृत्त्वाने दिले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महादेव बाबर, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हेही इच्छुक आहेत.
हडपसर विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाला उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. अशातच एकनाथ शिंदे गटाचे प्रमोद नाना भानगिरे यांनीसुद्धा हडपसर मधून उमेदवारी मागितली आहे. तर वडगाव शेरीमधून महायुतीत रस्सीखेच असल्याचे दिसून आले आहे. भाजपकडून जगदीश मुळीक यांनी उमेदवारी मागितली आहे. पण हि जागा अजित पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चा असल्याने सुनील टिंगरेंना तिकीट मिळण्याचे चान्सेस वाढले आहे. तरीही अजित पवार गटाची यादी जाहीर होईपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे.