दीपक जाधवपुणे : शालेय क्रमिक पुस्तकांच्या आधारे गाइड, प्रश्नसंच व इतर पूरक पुस्तके काढण्यासाठी खासगी प्रकाशकांकडून कॉपीराइटचे पैसे घेण्याचा निर्णय बालभारतीने घेतला आहे. यामुळे गाइड संस्कृतीला अधिकृत मान्यताच मिळणार आहे. त्याचे गंभीर दुष्परिणाम पुढील काळात सहन करावे लागतील, अशी भीती शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत आहे.बालभारतीने यंदा दहावीचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीमध्ये मोठे बदल केले. नवीन अभ्यासक्रम पाठांतराऐवजी आकलनावर जास्तीत जास्त भर देणारा आहे. घोकंपट्टीवर आधारित गाइड संस्कृतीला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्याचवेळी खासगी प्रकाशकांकडून गाइड काढण्यासाठी कॉपीराइटचे पैसे घेऊन एकप्रकारे गाइडला अधिकृत मान्यताच दिली जाणार आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बालभारतीची स्थापना १९६७ मध्ये करण्यात आली. आजवर बालभारतीने तयार केलेल्या कुठल्याही पुस्तकाचा कॉपीराइट घेण्यात आलेला नव्हता. शैक्षणिक साहित्य हे विद्यार्थ्यांपर्यंत स्वस्तामध्ये पोहचावे ही त्यामागची भूमिका होती. मात्र बालभारतीने यंदापासून नव्याने बदलण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचे कॉपीराइट हक्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी प्रकाशकांना यावर आधारित गाइड वा इतर कोणतेही साहित्य बाजारात आणायचे असेल तर त्यापोटी एका पुस्तकासाठी ६३ हजार रूपये भरावे लागणार आहेत.शैक्षणिक पुस्तकांच्या झेरॉक्स काढण्याविरोधात एक खटला सर्वोच्च न्यायालयात चालला. त्यावेळी शैक्षणिक पुस्तकांच्या झेरॉक्स काढण्यावर निर्बंध घालता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर बालभारतीचा कॉपीराइटचा मुद्दा न्यायालयात टिकणार नाही, असे मत मांडले जात आहे.बालभारतीकडून तयार केल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये लेखक, कवी यांच्या पुस्तकातील काही भाग घेतला जातो. गणित, भूमितीमधील सूत्रे, प्रमेय, विज्ञानातील सिद्धांत दिलेले असतात.इतिहास, भूगोल विषयाच्या पुस्तकांची रचनाही तशीच असते. त्यामुळे पाठ्यपुस्तकांचे कॉपीराइट घेणे बेकायदेशीर असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.गाइड न वापरण्यावर भर हवाबालभारतीने कॉपीराइटपोटी खासगी प्रकाशकांकडून पैसे घेणे म्हणजे मुळात गाइड वापरण्यास उत्तेजन दिल्यासारखे आहे. शिक्षकही मोठ्या प्रमाणात गाइडचा वापर करीत असतात. बालभारतीचा मुख्य उद्देश विद्यार्थी व शिक्षकांना गाइड वापरण्यापासून परावृत्त करण्याचा असला पाहिजे.- वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ
कॉपीराइटमुळे गाइड संस्कृतीला अधिकृत मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 4:26 AM