पुणे : ठेकेदाराने न केलेल्या केलेल्या कामाचे पैसे त्याला दिल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणी ६ अधिका-यांवर त्यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी समज देण्यात आली. संबंधित ठेकेदाराला २ वर्षे काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पाहणी करून दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली.सहकारनगर, कोंढवा-वानवडी, धनकवडी, बिबवेवाडी, टिळक रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीत दोन वर्षांत रस्ते, शौचालये, समाजमंदिरे बांधण्याची १४० कामे देण्यात आली होती. यातील बहुतांश कामे ठेकेदार नितीन वरघडे यांनी केली. या कामांसाठी त्याला महापालिकेकडून १३ कोटी ४० लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली. प्रत्यक्षात यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे नगरसवेक अविनाश बागवे यांनी सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी सादर केले होते. याची गंभीर दखल घेऊन महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने गेल्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत केलेल्या तपासणीत ही बाब स्पष्ट झाली आहे.ठेकेदाराने केलेल्या एकूण कामांपैकी ६२ कामे समितीला आढळूनच आली नाहीत. तसेच, जी कामे केली, त्यांचा दर्जाही अतिशय निकृष्ट असल्याचे दिसले. त्यामुळे या प्रकरणी आलेल्या समितीने सहायक आयुक्त सुनील गायकवाड आणि उपायुक्त विजय चव्हाण यांना लेखी समज दिली आहे. तर, अजित नाईकनवरे, रामकृष्ण वारे, गणेश पुरम, विजय पाटील, सूयर्कांत जमदाडे आणि एस. बी. उगले यांची वेतनवाढ रोखली आहे. त्याशिवाय नितीन वरघडे यांना दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले, अशी माहिती नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संबधित अधिकाऱ्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे. मात्र, त्यांना अथवा ठेकेदारांना करण्यात आलेली शिक्षा ही अल्प आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध पालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा; अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करू, असे बागवे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
ठेकेदारावर मेहेरनजर करणाऱ्या ६ अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली
By admin | Published: December 25, 2014 5:02 AM