राजगुरुनगर: पुणे - नाशिक रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासन शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणार आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. रेल्वेसाठी कवडीमोल भावाने कुठल्याही परिस्थितीत शेतजमिनी मिळणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत स्थानिक शेतकऱ्यांनी होलेवाडी, मांजरेवाडी या परिसरात रेल्वेच्या मार्गाची मोजणी करण्यास आलेल्या रेल्वे अधिकारी व मोजणी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले.
पुणे -नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मार्गाचे मोजणीचे काम सुरू झाले आहे. होलेवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या बागाईती शेतातून रेल्वे मार्ग जाणार आहे. बागाईती व तुंटपुजी असलेली शेतजमीन जाणार म्हणून शेतकरी हतबल झाला. जमीन थेट खरेदी पद्धतीमध्ये जमीन मालकाची परवानगी असल्याशिवाय सर्वेक्षण होऊ शकत नाही. या रेल्वे प्रकल्पाला आमचा विरोध असून, आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भूसंपादनाला सहमती नसल्याने भूसंपादन मोजणीची प्रक्रिया थांबविण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रांत यांना निवेदन देण्यात आले होते. तरीही मोजणीसाठी प्रशासन आल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. चार दिवसापुर्वी शेतकरी रेल्वे अधिकारी व खेड प्रशासन यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना समर्पक अशी उत्तरे या बैठकित मिळाली नाही. रेल्वे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही. त्यावेळीच शेतकऱ्यांनी निर्धार केला की, आधी प्रश्नांची उत्तरे दया. मगच मोजणी करा.
आज होणाऱ्या मोजणीला विरोध दर्शवून तसेच मोजणी करू नये असे निवेदन देऊनही होलेवाडी मांजरेवाडी या परिसरात रेल्वे मार्गाची मोजणी करण्यासाठी आज सकाळी १० वाजता रेल्वे अधिकारी, मोजणी कर्मचारी आले होते. मोजणी करण्यास त्यांनी सुरवात केली होती. यांची कुणकुण शेतकऱ्यांना लागताच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोजणी कर्मचारी यांना घेराव घालून पुन्हा जर येथे पुन्हा याल तर याद राखा अशी तंबी देऊन रेल्वे अधिकारी व मोजणी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, माजी उपसरपंच अर्जुन मांजरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.