पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावीचे सर्व प्रवेश केवळ आॅनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील काही कनिष्ठ महाविद्याल्यांकडून व्यवस्थापन, अल्पसंख्याक व शाळांतर्गत कोट्यातील प्रवेश नियमबाह्य पद्धतीने केल्यास संबंधित प्रवेश बेकायदेशीर ठरविले जाणार आहेत. तसेच प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांकडील पायाभूत व शैक्षणिक सुविधांची तपासणी केली जाणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत शैक्षणिक संस्थांकडून नियम धाब्यावर बसवून व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश दिले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. पुण्यासारख्या शहरात लहानशा खोल्यामध्ये कॉलेज सुरू केल्याचे दिसून आले. सर्व महाविद्यालयांमध्ये केवळ आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविणे बंधनकारक असताना, काही महाविद्यालयांकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेश देण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रलोभन दिले जात होते. प्रात्यक्षिक परीक्षेत २0 पैकी २0 गुण दिले जातील, वर्षभर कॉलेजला आले नाही तरी चालेल असेही कॉलेजच्या प्रतिनिधीकडून सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर एकही प्रवेश आॅफलाईन पद्धतीने दिला जाणार नसल्याचे टेमकर यांनी सांगितले. महाविद्यालयांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवेशाची नोंद आॅनलाईन पद्धतीन करावी लागणार आहे, असे स्पष्ट करून टेमकर म्हणाले, सर्व प्रवेश आॅनलाईन सिस्टिममध्ये दाखवावे लागणार आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना एकही प्रवेश आॅफलाईन पद्धतीने करता येणार नाही. कोणत्याही पायाभूत सुविधा नसणाऱ्या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना विविध प्रलोभने दाखविली जातील. मात्र, विद्यार्थ्यांनी या प्रलोभनांना बळी पडू नये. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालयांकडे असणाऱ्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांची तपासणी केली जाणार आहे.खासगी क्लासचालक व कनिष्ठ महाविद्यालयांबरोबर छुपा करार करून बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांचे प्रवेश करतात. मात्र, अशा पद्धतीने प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवरही शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमबाह्य पद्धतीने प्रवेश घेऊ नयेत, असेही टेमकर यांनी सांगितले.
आॅफलाईन प्रवेश बेकायदेशीर ठरवणार
By admin | Published: June 19, 2016 4:43 AM