पिंपरी : लोखंडी तलवारीने दुकानात तोडफोड करून जबरी चोरी केली. चिंचवडच्या पूर्णानगरमध्ये मंगळवारी (दि. १४) रात्री हा प्रकार घडला. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. दुसऱ्या घटनेत फ्लॅटचे कुलूप तोडून ८० हजारांच्या रोकडसह सोन्याच्या दोन अंगठ्या चोरट्यांनी लंपास केल्या.तिसऱ्या घटनेत घरफोडी करून चोरट्यांनी आर्मी कॅन्टीन कार्ड, हॉस्पिटल कार्ड यासह महिलेचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएमकार्ड, मतदार ओळखपत्रासह पाच लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला..यापैकी पहिल्या घटनेत ओमकार बालाजी करसुळे (वय १९, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. किसनाराम थानाराम चौधरी, (वय २३, रा. शनि मंदिरासमोर, पूर्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसनाराम चौधरी यांचे पूर्णानगर येथे किराणा मालाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी ओमकार करसुळे फिर्यादी किसनाराम चौधरी यांच्या दुकानात आला. दुकानातील दोन कॉम्प्यूटर, फ्रिज, वजन काटा, तेल डबा यांची आरोपी करसुळे याने लोखंडी तलवारीने तोडफोड केली. तसेच धक्काबुक्की करून फिर्यादी चौधरी यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. चिखली पोलीस तपास करत आहेत..............
* घरफोडी करून रोकडसह ऐवज चोरीला फ्लॅटचे कुलूप तोडून ८० हजारांच्या रोकडसह सोन्याच्या दोन अंगठ्या चोरट्यांनी लंपास केल्या. पिंपळे निलख येथे हा प्रकार घडला. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.जयंत एकनाथ वाघुले (वय ३७, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी जयंत वाघुले यांचा पिंपळे निलख येथे आकाशगंगा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. रविवारी (दि. १२) सकाळी ११ ते सोमवारी (दि. १३) रात्री ११च्या दरम्यान वाघुले यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. या दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. ८० हजारांची रोकड आणि १८ हजार रुपये किमतीच्या सहा ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा ९८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करत आहेत. .........घरफोडी करून चोरट्यांनी आर्मी कॅन्टीन कार्ड, हॉस्पिटल कार्ड यासह महिलेचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएमकार्ड, मतदार ओळखपत्रासह पाच लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. चिंचवडच्या काळभोरनगर येथे ही घटना घडली. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.रत्नकांत शिवराम भोसले (वय ५९, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रत्नकांत भोसले यांचे काळभोरनगर येथील राहते घर सोमवारी (दि. १३) ते मंगळवारी पहाटेपर्यंत बंद होते. दरम्यान चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवशे केला. लाकडी कपाटाचे ड्रावर उचकटून १५७.५ ग्रॅम सोन्याचे, हिºयाचे दागिने, घड्याळ, आर्मी कॅन्टीन कार्ड, हॉस्पिटल कार्ड तसेच फिर्यादी भोसले यांच्या पत्नी रोहिणी भोसले यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएमकार्ड, मतदार ओळखपत्रासह पाच लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.