पुणे: जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू असून, जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या स्थिर व भरारी पथकांनी तसेच उत्पादन शुल्क व पोलिसांनी आतापर्यंत १४ कोटी ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ९ कोटींची रोख रक्कम, १ कोटी ८२ लाखांच्या मद्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आचारसंहिता भंगाच्या ४८९ तक्रारीही नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेत खेडशिवापूर येथे सापडलेल्या पाच कोटींसह खेड आळंदी, मावळ, हडपसर, शिरूर, दौंड आणि वडगाव शेरी या ठिकाणी नऊ कोटींहून अधिक रकमेचा समावेश आहे. तसेच एक कोटी ८२ लाख रुपये किमतीचे २ लाख ४३ हजार लिटर मद्य जप्त करण्यात आले. तर भोसरी, चिंचवड, दौंड, जुन्नर, कसबा पेठ, खेड आळंदी, कोथरूड, मावळ, पुरंदर, शिवाजीनगर, शिरूर आणि वडगाव शेरी या मतदारसंघांतून सुमारे २३ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळले आहेत. कोथरूडमध्ये सुमारे ३७ किलो (किंमत १८ लाख १२ हजार रुपये) चांदी जप्त करण्यात आली आहे. तसेच पर्वती मतदारसंघात ४३ हजार ७९२ ग्रॅम (किंमत १३८ कोटी रुपये) सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आले. मात्र, त्याची शहानिशा करून ते दागिने संबंधित सराफांना देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय अन्य साहित्य भरारी पथकासह पोलिसांकडून जप्त करण्यात आली. एकूण १४ कोटी ५७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
जिल्ह्यातील २१ मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या एकूण ४९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून १५८ इतक्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्याशिवाय पर्वती, कसबा पेठ, पुरंदर, शिवाजीनगर या मतदारसंघांतून तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.