पुणे : वाढते वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यासाठी वेगवेगळ्या थेरपीही केल्या जातात पण स्थूलपणा कमी करण्यासाठी ही थेरपी एका महिलेसाठी धोकादायक ठरली. या थेरपीमुळे महिलेची मज्जासंस्थाच बिघडली आहे. पुण्यात हे प्रकरण समोर आलं आहे.
तरुणाईमध्ये दिवसेंदिवस स्थूलपणा वाढत आहे. त्यामुळे तरुणाई जिम, डाएट, शस्त्रक्रिया करुन स्थूलपणा कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या सगळ्या प्रयत्नात ते शरीराची हेळसांड करतात. नांदेडच्या 33 वर्षीय गौरी अत्रे नावाच्या महिलेने स्थूलपणा कमी करण्यासाठी नॅच्युरोपथीवर आधारित वजन करण्याची थेरपी घेतली. पण ह्याचा परिणाम भयावह होता. तिची मज्जासंस्था पूर्णत: बिघडली असून आता तिला चालता, बोलताही येत नाही. शिवाय बसण्यासही अडचणी येतात. गौरी अत्रे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. मज्जासंस्थेशिवाय त्यांना अजूनही त्रास सुरु झाले आहेत. त्यांच्या मान, हात आणि पायांवर अनेक गाठी आल्या आहेत.