मंचर: हौसेला मोल नसते. या हौसेपोटीच मग वाट्टेल ती किंमत मोजून आपली आवडीची गोष्ट मिळवली जाते. असाच काहीसा प्रकार मंचर येथे घडला. 'राणी' नावाच्या गायीला एका शेतकऱ्याने तब्बल १ लाख ३१ हजार १११ रुपयांना खरेदी केले. ह्या 'खरेदी'ची चर्चाच झाली नसती तरच नवल.
मंचर येथील शेतकरी गणेश अनंतराव खानदेशे यांच्या राणी नावाच्या गाईला वाघापूर येथील शेतकऱ्याने तब्बल एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपयांना विकत घेतले आहे. वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या या राणी गायीचे सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू असून परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील गणेश अनंतराव खानदेशे यांच्या गोठ्यातील राणी नावाच्या गायीचं कौतुक केले जात आहे. त्यांनी पंजाबमधून ऐंशी हजाराला एक गाय खरेदी केली होती. तिला इकडे आल्यानंतर वासरू झाले.मग योग्य व्यवस्थापनातून त्यांनी ह्या गाय वासरांचे उत्कृष्ट संगोपन केले.आठ दिवसात दोन वेळेस 25 लिटर दुध देत आहे.
राणी या गायीचे वजन साडेपाचशे किलो असून तिने ऐंशी किलो वजनाच्या कालवडीला जन्म दिला. ही गाय अतिशय शांत स्वभावाची आहे, रंगाने सफेद ,काळीबांडी, शरिराचा पुढील भाग लहान व मागील भाग मोठा, दोन दाती, कान डोके लहान, सडात योग्य अंतर आहे. कासेची ठेवण गुडघ्याच्या वर,मागील पायाची बाजू सरळ,या इतर सर्व बाबी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने वाशीम, सांगली,कोल्हापूर, जालना, धुळे, नाशिक, सोलापूर, सातारा, नांदेड, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, पुणे या भागातील लोक गाय पाण्यासाठी व खरेदीसाठी आले होते.
महाराष्ट्रात आपल्या वातावरणात तयार झालेली ABS ब्रीडची जास्त दुध देणारी गाय असल्याने दुधाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना देखील या सर्वगुणसंपन्न आंबेगावच्या राणी गायीची उच्चांकी भावाने एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपये रुपयांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वाघापूर गावचे प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक विश्वास रकटे पा.यांनी मंचर येथून खरेदी केली.यावेळी वाघापूर येथील दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब औटी, संगमनेर येथील युवा उद्योजक रविशेठ हासे, खेड तालुक्यातील उद्योजक वैभव पोकळे पाटील, राहूल शेटे आदी उपस्थित होते.