पुणे : मोबाईल टॉवरमुळे चिमण्या, साळुंक्या कमी झाल्याची ओरड होताना दिसून येते. पण एका करकोचाने (स्टाँर्क ) या टॉवरवरच आपलं घरटं बांधलं आहे. पुण्यालगतच्या छोट्या गावात हे घरटं पक्षी अभ्यासक डाँ. श्रीकांत इंगळहळीकर यांना ते दिसले आहे. साधारण जुलै-आँगस्ट पासून करकोचा घरटं बांधायला सुरवात करत असतो. आता त्यात दोन पिल्लं आहेत.
युरोपमध्ये लहान गावातल्या घरांच्या छपरांवर करकोचे (स्टाॅर्क) घरटी करतात. त्यांची पिल्ले आणि त्यांचे संगोपन पाहून युरोपियन लोकांना करकोच्यांचे खूप आकर्षण वाटते. छपरांवर टोपल्या ठेवून युरोपियन लोक या पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी निमंत्रण देतात. 'मी कसा जन्मलो' असे जेव्हा लहान मुले उत्सुकतेने आई बाबांना विचारतात तेव्हा 'तुला स्टाॅर्क पक्षी घेउन आला' असे युरोपमधले पालक मुलांना सांगतात. अशी दंतकथा आहे. घरात बाळ येण्यासाठी स्टाॅर्कने घरावर घरटे करून अंडी घालणे हा शुभशकुन मानला जातो, असे इंगळहळीकर यांनी सांगितले. पुण्यालगतच्या एका गावात स्टाॅर्क पक्षी दरवर्षी स्वत:चीच बाळं घेऊन येतो. अनेक वर्षे या घरट्याचे ते निरीक्षण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुदळ्या किंवा ब्लॅक आयबिस पक्षी देखील हल्ली मोबाईल टाॅवर वर घरटी करताना दिसतात. आपल्याकडचा निवासी 'पांढऱ्या मानेचा करकोचा' (वुली नेक्ड स्टाॅर्क) उंच झाडावर घरटे करतो. मात्र इथे त्याने गावातल्या मोबाईल टाॅवरवर घरट्यासाठी जागा निवडली आहे. या भागात अनेक उंच लोखंडी मनोरे आहेत पण या जोडीने गजबजलेल्या बाजारातला हा मनोरा शोधला आहे. दर वर्षी पावसाळ्यानंतर दोन पिल्ले इथल्या घरट्यात जन्मतात. करकोचे मासे, खेकडे, शिंपले, बेडूक हे त्याचे खाद्य पिल्लांना भरवतात. नर मादी आळीपाळीने खाणे आणणे आणि कावळ्यांपासून घरट्याचे रक्षण करणे ही कामे करतात.--------------------------------
मोबाईल टाँवरमधील लहरींमुळे शहरातले चिमण्या, साळुंक्या सारखे पक्षी दूर गेलेत हा समज या करकोच्यांनी खोटा ठरवला आहे. आता मोबाईल टाँवर कंपनीने हे घरटं किमान त्यांची पिल्लं मोठी होईपर्यंत तरी काढू नयेत. - डाँ. श्रीकांत इंगळहळीकर, पक्षी अभ्यासक--------------