पुणे : चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेल्या चोरट्याने तेल घाना व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करून घरामधील तब्बल सव्वातीन लाखांचा ऐवज चोरून नेला. खळबळ उडवून देणारी ही घटना शिवाजीनगरमधील शिक्षण मंडळ कार्यालयाजवळ घडली. या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चोरट्यांकडून थेट प्राणघातक हल्ले होऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.नारायण हंसानंद नागदेव (वय ५०, रा. १०१, शिवाजीनगर) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ गंगाराम (वय ६०, रा. शरद सोसायटी, सेनापती बापट रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण यांना सहा भाऊ आणि एक बहीण आहे. नागदेव यांचा शिवाजी पुलाजवळून न्यायालयाकडे जाणाऱ्या बोळामध्ये नागदेव घाना नावाने तेल घान्याचा व्यवसाय आहे. त्यांचे दोन मोठे भाऊ पिंपरीमध्ये राहण्यास असून, त्यांचा वेगळा व्यवसाय आहे. तर, नारायण त्यांचे भाऊ गंगाराम व भूपिंदर यांच्यासोबत व्यवसाय करीत होते. न्यायालयाकडे जाणाऱ्या बोळात असलेल्या त्यांच्या दुकानामागेच भाड्याच्या घरामध्ये नारायण राहत होते. हे घर त्यांच्या वडिलांपासून भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. शनिवारी सकाळी नारायण त्यांच्या नागदेव मसाला नावाच्या दुकानामध्ये कामाला गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते घरी गेले होते. रात्री साधारणपणे सव्वाआठच्या सुमारास गंगाधर यांनी दुकान बंद केले. त्यांनी पाठीमागे जाऊन नारायण यांची भेट घेतली तेव्हा ते ओशो रजनिश यांचे पुस्तक वाचत बसलेले होते. गंगाधर यांनी दिवसभरामध्ये जमा झालेली दुकानातील एक लाख रुपयांची रक्कम टीव्हीच्या खाली असलेल्या पेटीमध्ये ठेवली. या पेटीला कुलूप लावून त्याची चावी वरच्या कपाटात ठेवून गंगाधर त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्यांचे दूरध्वनीवरून पुन्हा बोलणे झाले. साधारणपणे मध्यरात्रीनंतर आलेल्या चोरट्यांनी झोपेतच त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील तिजोरी उघडून दोन लाखांचे दागिने चोरून नेले. हे दागिने त्यांच्या आईचे होते. यासोबतच पेटीत ठेवलेले एक लाख रुपये आणि एक टीव्ही असा एकूण ३ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे गंगाधर दुकानावर आले असता त्यांना दुकान बंद दिसले. त्यांनी पाठीमागे जाऊ न पाहिले असता घराचे दरवाजे व खिडक्या उघड्या दिसल्या. बेडवर झोपलेल्या अवस्थेत पडलेल्या नारायण यांना हलवून पाहिले असता ते मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
चोरट्यांकडून तेल व्यापाऱ्याचा खून
By admin | Published: February 22, 2016 4:06 AM