लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पौड रोडवरील कचरा डेपातून कचरा वाहतूक करणार्या गाड्यांमधून सांडलेला कचरा तसेच कचरा डेपोतून पावसाचे पाणी वाहून रस्त्यावर येत असल्याने या भागातील रस्ता धोकादायक झाला आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसाने या ठिकाणी तेलकट झालेल्या रस्त्यावरुन अनेक दुचाकी घसरुन पडल्या. काही दुचाकीस्वारांना दुखापतीला सामोरे जावे लागले.
शहरात गेले दोन दिवस पाऊस सुरु आहे. रविवारी सायंकाळी तसेच सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. पौड रस्त्यावरील कचरा डेपोतील रॅमकडे कचरा गाड्या जातात. कचरा वर्गीकरण केल्यानंतर तेथून पुन्हा गाड्या बाहेर पडतात. गाड्यांच्या चाकाला लागलेल्या कचरा रस्त्यावर पडतो. तसेच पाऊस पडला की कचर्यावर पडलेले पाणी वाहून ते रस्त्यावर येते. हे पाणी तेलकट असल्याने रस्त्यावर पसरुन त्यामुळे दुचाकी वाहने घसरुन पडतात. कचरा डेपोबाहेरील पावसाचे पाणी वाहून जाणार्या वाहिन्या तुंबल्या असून त्यातून पाणी रस्त्यावर येत आहे.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या कोथरूड केंद्राला त्वरित देण्यात आली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख गजानन पाथ्रुडकर आणि जवानांनी तेथे भेट दिली. पाण्याचा मारा करूनही तेलकट कचरा निघत नसल्याचे निदर्शनास आले. कचरा डेपोतील वाहनांमधून पडणारा कचरा तसेच वाहनांच्या चाकाला लागलेल्या कचर्यामुळे रस्ता निसरडा झाल्याचे सांगण्यात आले. दुचाकीस्वार घसरल्याने त्यांना दुखापत झाली. जवानांनी निसरडा झालेल्या रस्त्यावर माती टाकली. नागरिकांनी या भागातून ये-जा करणार्या दुचाकीस्वारांना दुचाकी जपून चालविण्यास सांगितले.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले असून कचरा डेपोतून हे तेलकट पाणी रस्त्यावर येणार नाही, याविषयी तातडीने उपाय योजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.