कोरेगाव भीमा - राज्यातील पहिली टॅबलेट शाळा म्हणून नावारूपाला आलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने तीन वर्षांत ३२ पटसंख्येवरून तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षणप्रणाली देत असतानाच १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असल्याने देशातल्या पहिल्या ओझोन व झीरो एनर्जी स्कूल वाबळेवाडी शाळेचा पॅटर्नचा राज्यभर प्रचार प्रसार व्हावा व पुढच्या वेळी या शाळेची अजुन सक्सेस स्टोरी ऐकायला मिळणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, रेखा बांदल, पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच जयश्री भुजबळ, वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी शाळेस कोट्यवधी रुपयांची जागा शाळेला दान केल्याबद्दल शेतकऱ्यांचा व देशातील शालेय विभागात सतत नावीण्यपूर्ण बदल घडवत राज्यात अग्रगण्य अशा वाबळेवाडी पॅटर्नचे शिल्पकार दत्तात्रय वारे गुरुजी यांचा सन्मान अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले, की ‘दर्जेदार शिक्षणाअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना वाबळेवाडी सारख्या शाळेने केलेली दर्जात्मक प्रगती ही कौतुकास्पद असल्याचे सांगत राज्यातील पहिली झीरो एनर्जी स्कूल होण्याचा बहुमान शाळेस मिळाला असून बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रतीक्षा यादीत असल्याने जिल्हा परिषद शाळांनीही कात टाकली असल्याचे सांगितले.यावेळी मंगलदास बांदल म्हणाले, जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने मनात आणले तर काय होवू शकते, याचे उदाहरण वारे गुरुजींनी आपल्या लामातुन दाखवुन दिले असुन यापुढिळ काळात वाबळेवाडीप्रमाणे परिसरातील सर्वच शाळा आधुनिक करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.बँक आॅफ न्यूयॉर्कच्या मदतीमुळे वर्षभरापूर्वी बांधायला सुरू केलेल्या ८ झीरो-एनर्जी क्लासरूम नुकत्याच तयार झाल्या आहे. ही परदेशातील सुसज्ज आणि हायटेक शाळेची जाणीव होते. या शाळेने ५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्याला चकित केले होते. या शाळेला राज्य सरकारने इंटनॅशनल स्कूलमध्ये वर्गीकृत करून या शाळेत ‘पिसा’ अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे. तो येत्या जूनपासून सुरू होतोय. शाळेच्या दर्जात्मक कामाची दखल घेऊन मागील मार्चमध्ये अमेरिकेची ट्रेझरी-बँक, बँक आॅफ न्यूयॉर्कने आठ वर्गखोल्या उभ्या करून दिल्या. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यामातूनही या कामास अर्थसाह्य लाभले. अशा राज्यात आदर्श ठरत असलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन प्रसंगी अमृता फडणवीस बोलत होत्या.
ओजेस देशातील पहिली टॅबलेट शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:35 AM