पुणे : भेंडी, गवार, दोडका, काकडी, कारली, वांगी, सिमला मिरची, तोंडली, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. साधरण १०-२० टक्क्यांपर्यंत भाव घटल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच फळभाज्यांच्या भावातही घट झाली आहे. तर केवळ हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. रविवारी मार्केट यार्डात नेहमीच्या तुलनेत म्हणजे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली आहे.
तरकारी विभागात कोरोनाकाळातील सर्वांत मोठी फळभाज्यांची आवक झाली आहे. मात्र, त्या तुलनेत मागणी कमी असल्याने भेंडी, गवार, दोडका, काकडी, कारली, वांगी, सिमला मिरची, तोंडली आणि घेवड्याच्या भावात सुमारे १० ते २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तर, केवळ हिरवी मिरची महागली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
परराज्यातील आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून कोबी २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, इंदौर येथून गाजर ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो घेवडा, कर्नाटक येथून १०० गोणी मटार, कर्नाटक येथून पावटा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ४ ते ५ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची ७ ते ८ ट्रक इतकी आवक झाली.
सातारी आल्याची १२०० ते १३०० पोती, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टॉमेटोची सहा ते सात हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग १५० पोती, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गावरान कैरी २ ते ३ टेम्पो, कांदा ४० ते ४५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ५० ट्रक इतकी आवक झाली.
---
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :-
कांदा : १६०-२००, बटाटा : ८०-१२०, लसूण : ३००-१०००, आले सातारी : १००-२००, भेंडी : १००-२००, गवार : गावरान व सुरती १५०-२५०, टोमॅटो : ५०-८०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : ४००-४५०, दुधी भोपळा : १२०-१६०, चवळी : १५०-२००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : २५०-३००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : १००-१५०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १०-२००, तोंडली : कळी १५-२००, जाड : ८०-१००, शेवगा : ४००-४५०, गाजर : २००-२२०, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१२०, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२००, मटार : स्थानिक आणि परराज्य : ८००-१०००, पावटा : ३००-४००, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी : तोतापुरी १६०-१८०, गावरान : १००-१५०, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.