लोकमत न्यून नेटवर्क पुणे : निळ्या रंगाच्या एका ओला एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला पुण्यामध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंपनीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. कंपनीने सर्व स्कुटर मागे घ्याव्यात आणि बदलून द्याव्यात, अशी मागणी आता हाेत आहे.
व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ओला स्कूटरला आग लागली आहे. बॉडीवर्कच्या खालून धूर येताना दिसत आहे. पाहता पाहता स्कूटरला आगीने घेरल्याचे दिसत आहे. कंपनीने सांगितले की, या घटनेतील दुचाकी चालक सुरक्षित आहे. कंपनीने स्पष्ट केले की, पुण्यातील या घटनेची आम्हाला माहिती मिळाली. घटनेची चौकशी सुरू केली आहे. कंपनी वाहन सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे. यावर उचित कारवाई करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती आगामी काळात जनतेसमोर मांडू. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बॅटरी अधिक गरम झाल्याने अशी घटना घडू शकते. असेही सांगितले जात आहे की, इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागणे हा प्रकार नवा नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. चार्जिंगच्या दरम्यान आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ओला एस १ प्रो स्कूटरमध्ये ३.९७ केडब्ल्यूएचची लिथियम-आयर्न बॅटरी आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर १८१ किमी चालते. ११५ किमी प्रति तास हा स्कूटरचा टॉपचा स्पीड असल्याचे सांगितले जाते. या मॉडेलची किंमत १.३० लाख रुपये इतकी आहे. ओलाने अलीकडेच १७ मार्च २०२२ रोजी आपली नवीन खरेदी विंडो सुरू केली आहे.