थेऊर: कुंजीरवाडी गावाच्या हद्दीतून जाणारा पुणे पाटबंधारे खात्यांतर्गत असलेला जुना बेबी कालवा गेले तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पाझरू लागला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही कर्तव्यदक्ष अधिकारी चालढकलपणा करून तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करत आहे त्यामुळे वेळोवेळी हा कालवा पाझरत आहे.जुन्या कालव्या लगत लागूनच लोकवस्ती व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. या कालव्याचे पाझरलेले पाणी शेजारील शाळेच्या आवारात व स्थानिकांच्या घरामध्ये घुसत आहे. अगोदरच साथीच्या आजारांच्या सावटामुळे स्थानिक नागरिक त्रस्थ असून अशा वेळेस या पाण्यामुळे वाढत चाललेली दुर्गंधी व मच्छर यामुळे स्थानिक बेहाल झालेले आहेत.
बेबी कॅनॉलचा भराव मजबूत नसल्याने केव्हाही तो फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते असे जर झाले तर याला जबाबदार कोण अशी स्थानिक नागरिकांमध्ये सध्या चर्चा आहे. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून देखील याची दखल कोणीही घेत नाहीत.
२९ डिसेंबरपासून संबंधित अधिकाऱ्यांशी कालव्याच्या भरावाबाबत चर्चा केली. परंतू त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ३० डिसेंबरला स्थानिक तरुणांनी कालव्यात साचलेली जलपर्णी व तात्पुरत्या स्वरुपात गाळ काढून पाण्याला वाट करुन दिली. परंतु, या पाण्याचा प्रवाह सुरळीत करायचा असेल तर कालव्यातील गाळ साफ करणे गरजेचे आहे.तसेच कालव्यांतर्गत काँक्रीटीकरण करणे गरजेचे आहे.
आम्ही २०१६ पासुन कार्यकारी अभियंता,खडकवासला,अधिक्षक अभियंता पाटबंधारे पुणे,उपविभागीय अभियंता मुठा कालवे स्वारगेट या सर्वांना ग्रामपंचायतीतर्फे कालव्याच्या पाझरण्याबाबत वेळोवेळी लेखी अर्ज केलेले आहेत परंतु या समस्येवर कायमस्वरूपी चा तोडगा मात्र निघत नाही, असे कुंजीरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.
शुध्दीकरण प्लांटची आवश्यकता
शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता बेबी कालव्यामध्ये साेडले जाते. वास्तविक पाहता सांडपाण्यावर शुद्धीकरण करुनच पाणी कालव्यामध्ये सोडणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नाही. त्यामुळे शुद्धीकरण प्लांटली आवश्यकता आहे. दरम्यान, बेबी कालवा लायनिंगचा प्रस्ताव तयार केलेला असून तो मान्य होताच काम सुरू करणार आहोत.तोपर्यंत कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथे ज्या ठिकाणी समस्या आहे ती तातडीने आम्ही दुरुस्त करणार असल्याचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे शेलार यांनी सांगितले.
मागील दोन दिवसांपासून आम्ही प्रशासनाशी चर्चा करून देखील या समस्येवर उपाय निघत नाही ही खेदजनक बाब असून मागील अनेक वर्षांपासून फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत.तरी प्रशासनाने दिरंगाई न करता सदरील कालव्याचे काम पूर्ण नाही केले तर आम्ही सर्व तरुण उपोषणास बसणार असून या कालव्यामुळे होणाऱ्या पुढील सर्व समस्यांना संबंधित विभाग जबाबदार असेल.
प्रमोद सावंत
उपाध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस
जुन्याबेबी तलाव पाझरू लागल्याने साचलेले पाणी
०१ थेऊर