आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची (ता. खेड) येथे इंद्रायणी नदीतील जलपर्णीत अडकलेल्या वृद्धास अग्निशमन दल व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. मागील तीन-चार दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
आळंदीत शुक्रवारी (दि. १२) इंद्रायणी नदीतील गरुड स्तंभाच्या पुलाजवळील नदीपात्रात असणाऱ्या जलपर्णीच्या थरावर एक वृद्ध व्यक्ती प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करीत होता. दरम्यान, त्या वृद्धाचा पाय जलपर्णीत अडकून ती व्यक्ती इंद्रायणी नदीत बुडू लागली. सदरची घटनेची माहिती नगरसेवक सचिन गिलबिले यांनी आळंदी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाने पोलीस विभागाला माहिती कळवत तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वृद्ध व्यक्तीस नदीपात्रातील पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
या मोहिमेत आळंदी नगर परिषद अग्निशमन दल विभागाचे ड्रायव्हर विनायक सोळंके, प्रसाद बोराटे, पद्माकर शिरामे, आरोग्य विभागाचे हनुमंत लोखंडे व पोलीस शिपाई गणेश कटारे सहभागी झाले होते. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे धोकादायक नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.