भोर तालुक्यातील भोरपासून १८ किमीवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली, त्यावेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावे उठवून स्थलांतरित झाली आहेत. स्थलांतरित झालीतरी जुन्या आठवणी तशाच राहिल्या आहेत. परंतु या गावाच्या वेशी, घरे, जुन्या वड्यांच्या खुणा, मंदिरे आजही आपल्याला या धरण क्षेत्रात पाणी कमी झाल्यावर पाहवयास मिळतात.
भाटघर पाणलोट क्षेत्रात जुन्या वेळवंड गावठाणातील पांडवकालीन नागोबाचे मंदिर गेले दहा महिने पाण्यामध्ये असते पाणी कमी झाल्यामुळे मंदिर पाहण्यास मिळत आहे. मंदिराचा गाभारा व मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मंदिराच्या कळसाचे बांधकाम चुनखडक व वाळूमध्ये केलेले आहे. मंदिरासमोर पार्वतीमातेची मूर्ती व नंदी आहे. या भागात पाऊस जास्त असल्याने दरवर्षी पावसामुळे धरणातील गाळ व पाणी गाभाऱ्यामध्ये साचून राहते. वेळवंड गावातील ग्रामस्थ व तरुण मुले गाभऱ्यातील गाळ काढून मंदिराची स्वच्छता करतात. पांडवकालीन पौराणिक मंदिर पाहण्यासाठी परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. हा प्राचीन काळातील सांस्कृतीक वारसा जतन करण्याची काळाची गरज वेळवंड परिसरातील ग्रामस्थ करीत आहे.
भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी झाल्यावर आपल्या गावदेवाचे दर्शन मिळते.
छाया - स्वप्निलकुमार पैलवान