पुणे : नगरविकास विभागाच्या आदेशानुसार केवळ मिळकतकर, पाणीपट्टी यासाठी विशिष्ट मुदतीपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश काढले होते; मात्र पुणे महापालिकेत बांधकाम शुल्क भरून घेण्यासाठी रोखीने जुन्या नोटा स्वीकारण्यात आल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर नागरिकांना नवीन नोटा उपलब्ध होईपर्यंत मालमत्ता कर, पाणीपट्टी आदी कर भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश काढले; मात्र यामध्ये बांधकाम शुल्क स्वीकारण्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता, तरीही जुन्या नोटा स्वीकारण्यात आल्या आहेत. महापालिकेने नगरविकास विभागाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढला. याप्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
जुन्या नोटात घेतले बांधकाम शुल्क
By admin | Published: November 18, 2016 6:32 AM