मंचर पोलिसांची बदनामी करण्याच्या हेतूने अवैध व्यावसायिक व खंडणीखोर पोलिसांच्या संदर्भातील मागील काही व्हिडीओ व्हायरल करत आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावर काही व्हायरल करताना सत्यता पडताळावी, अन्यथा चुकीचे मेसेज व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विरुद्ध त्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्यचे कोरे यांनी सांगितले.
मागील दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावडेवाडी येथे आईवडिलांना शेतात डबा घेऊन निघालेल्या मुलाला पोलिसांची अमानुषपणे मारहाण अशा मजकुराचा व्हिडीओ व मॅसेज व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हा जून 2020 लॉकडाऊन काळातील असून, संबंधित पोलीस आमलदार यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे. सध्या मंचर पोलिसांनी अवैध व्यावसायिक व खंडणीखोर यांच्याविरुद्ध कारवाई केल्यामुळे दुखावलेल्या अवैध व्यावसायिकाकडून व्हिडीओ जाणूनबुजून पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी व्हायरल केला जात आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला, त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले.