पुणे : तुम्ही पिंपरी चिंचवडीमधील हिंजवडी, बाणेर किंवा पाषाण भागात गेलात आणि तिथे तुम्हाला कारमधून भाजी विकताना आजीबाई दिसल्या तर आश्चर्य वाटायला नकाे. मान भागातील भरणे आजी चक्क इनाेव्हा कारमधून भाजी विक्री करतात. त्यांचा हा वेगळाच थाट पाहून नागरिकही कुतुहलाने त्यांच्या या अनाेख्या भाजी विक्रीबाबत विचारणा करतात.
भरणे आजी राेज पिंपरी चिंचवड भागात भाजी विकतात. त्यासाठी त्या त्यांच्या मुलाच्या इनाेव्हा गाडीचा वापर करतात. सकाळी लवकर त्या शेतातील भाजी काढून 9 वाजता सांगवी, हिंजवडी, बाणेर या भागामध्ये भाजी विकण्यासाठी येतात. यात त्यांना त्यांचा मुलगा मदत करताे. आजींची एकूण 15 एकर जमीन आहे. यात विविध प्रकारच्या भाजीपाला पिकवला जाताे. आजी राेज आपल्या शेतातल्या ताज्या भाज्या विकण्यासाठी विविध ठिकाणी जातात. इनाेव्हाच्या डिक्कीमध्ये त्या आपलं छाेटंस दुकान थाटतात. अनेक नागरिक आवर्जुन त्यांच्याकडून भाजी खरेदी करतात. कारमधील भाजीचं दुकान पाहून अनेकांना आजींचे काैतुक वाटते.
गाडीतूनच भाजीपाला विकत असल्याने विविध ठिकाणी भाजीपाला विकणे आजींना साेपे जाते. दरराेज आजींना या भाजीपाल्याच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतात. तीन चाकी गाडीवरून चालू झालेला प्रवास हा आज एका 15 लाखाच्या कार पर्यंत येऊन पोहोचला आहे. यंदा चांगला नफा झाल्याने आणखी एक महागडी कार खरेदी करण्याचा त्यांच्या मुलाचा मानस आहे.