पुणे : दोघेही कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंगचे काम करायचे. ज्या ठिकाणी त्याचे काम सुरू आहे त्याच परिसरात दोघांची एकाच खोलीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील एक वयाने मोठा असल्याने दुसऱ्याला नेहमी घरातील कामे सांगायचा, वेळ पडली तर दारूच्या नशेत मारहाणदेखील करायचा. या त्रासाला कंटाळून अखेर १९ वर्षीय आरोपीने त्याला संपवले. पोलिसांनी संशयावरून आरोपीला लगेचच बेड्या ठोकल्या.
कमल रोहित ध्रुव (१९, रा. येवलेवाडा) असे अरोपीचे नाव आहे. तर, मोहम्मद नसीम ऊर्फ समीर सईदुल्लाह अन्सारी (३७) मृताचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल वाहीद हमीद अन्सारी (४०, रा. माळवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम अन्सारी हा कमलला सारखा त्रास द्यायचा. घरातील सर्व कामे त्याला करायला लावायचा. इतकेच नाही तर दारू पिऊन मारहाण करायचा. सोमवारी (ता. ९) रात्रीही नसीम याने ध्रुवला दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण केली आणि घराच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर आरोपी ध्रुव त्याच्या पाठोपाठ गेला आणि त्याला मारहाण करत गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात येऊन तो पुन्हा रूमवर झोपला. मात्र, मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासांत कोंढवा पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपी ध्रुव याला अटक केली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, विशाल मेमाने, लवेश शिंदे, विकास मरगळे, शशांक खाडे, अभिजित रत्नपारखी आणि राहुल वंजारी यांच्या पथकाने केली.
खिशातील मोबाइलवरून लागला सुगावा...
कोंढव्यातील कामठे पाटीलनगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून जवळच एका निर्जन ठिकाणी पोलिसांना मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. मारहाण करत गळा आवळून त्याचा खून करण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मृताच्या खिशात सापडलेल्या मोबाइलवरून त्याने शेवटचा फोन कमल ध्रुव याला केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कमल ध्रुव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.